११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण Balaji Sutar
११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन
अध्यक्षीय भाषण
नमस्कार!
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून काही बोलण्याची संधी मिळते आहे, त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या इथल्या शाखेचे अध्यक्ष श्री दगडू लोमटे, मसापचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य, मसापच्या कामात आणि एकंदरीतच अंबाजोगाईच्या सार्वजनिक जीवनात सदैव पथदर्शी असलेले श्री अमर हबीब, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री सुदर्शन रापतवार, स्वागत-समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, आणि इतरही सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
माझ्या आधीचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य यांचे मला स्वतंत्रपणे आभार व्यक्त करावे लागतील, याचं कारण, इथे अंबाजोगाईत आल्यावर ज्यांच्याकडे बघून आपणही काही लिहून पाहावं अशी मनात इच्छा उमटायला लागली, त्यातलं एक मोठं नाव ‘दासू वैद्य’ हेच होतं. मला याक्षणी प्रा. रंगनाथ तिवारी आणि प्रा. शैला लोहिया यांचीही आठवण येते आहे. या सगळ्यांच्या ‘अक्षरांचं’ माझ्यावर अतोनात ऋण आहे.
याआधी अतिशय महनीय आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मी त्या सगळ्यांच्या तुलनेत अतिशयच छोटा लेखक आहे, या गोष्टीची मला परखड जाणीव आहे. आताही, माझ्याशिवाय खूप सारे लिहिते लोक या आसनावर बसण्यासाठी योग्य आहेत, याचीही मला नम्र जाणीव आहे.
‘साहित्य संमेलन’ या आयोजनाबद्दल मला, मी काहीही लिहित नव्हतो, तेव्हापासून ओढ वाटते. अनेकदा संमेलनांबद्दल लोक चांगलं बोलत नाहीत, हे मला ठाऊक आहे. काहीही लिहित नव्हतो, आणि फक्त वाचत असायचो, त्या काळापासून मी पदरमोड करून संमेलनांना जात आलेलो आहे. निव्वळ ‘श्रोता’ म्हणून! अतुल आकुसकर आणि शेखर आडसकर या दोन मित्रांसोबत अतुलच्या बजाज मोटरसायकलवर ट्रिपलसीट बसून गावापासून शे-दीडशे किलोमीटरच्या त्रिज्येतल्या अनेक संमेलनांना आम्ही तिघेजण त्यावेळी निव्वळ ऐकण्यासाठी आणि कवी-लेखकांना ‘पाहण्यासाठी’ जायचो. त्यावेळी, आणि नंतरही कधी, स्वत:हून 'कवीकट्टा' वगैरेची पायरी चढलेलो नसलो, तरी, पुढे थोडाफार गंभीरपणे लिहायला लागल्यानंतर या अंबाजोगाई साहित्य संमेलनापासून, मराठवाडा साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांपर्यंतचे सोहळे मी ‘निमंत्रित’ म्हणून मंचावरून अनुभवलेले आहेत.
या सगळ्यात, मला छोट्या संमेलनांबद्दल नेहमीच प्रेम वाटत आलेलं आहे. छोट्या म्हणजे भौगोलिक व्याप्तीच्या अर्थाने छोट्या. जिल्ह्या-तालुक्यापुरती, किंवा आपल्यासारखी गावापुरती होणारी संमेलने.
'आम्ही नामवंत लेखक (किंवा आयोजक) आहोत', असं कसलंही अभिनिवेशी ओझं न मिरवणारी आणि साहित्याबद्दल मनापासून प्रेम असलेली मंडळी अशा संमेलनांमध्ये अधिक असतात. पदरमोड करून संमेलन बघायला, ऐकायला येणारी, तिथे स्टॉलवर जमेल तशी पुस्तकं चाळणारी, विकतही घेणारी, गावा-खेड्यातली साधीसुधी उत्सुक वाचक-माणसं अशाच संमेलनांमधून पाहायला मिळतात. ही पुस्तकांवर जीव लावणारी, कुतूहलाने पुस्तकं हाताळणारी, निरखणारी माणसं बघायला मला आवडतं.
साहित्याच्या अनेक व्याख्या करता येतात, मात्र ‘संमेलन’ ही गोष्ट व्याख्येत बसवता येणं जरासं कठीण आहे. सुगीच्या हंगामात भरघोस पीक यावं त्याप्रमाणे दिवाळीपासून पुढे पाडव्यापर्यंत वेगवेगळ्या संमेलनांची रेलचेल महाराष्ट्रात असते. काही शहरांत लिट-फेस्टही होतात. ‘दर्जा’ मात्र मोजक्याच ठिकाणी राखला जाताना दिसतो, कारण मुळात विचार करणारी आणि संवेदनशील माणसेच कमी संख्येने असतात. सध्याच्या कोलाहलाच्या काळात अशा लोकांचं विखरून जाणं, भ्रष्ट होणं किंवा त्यांचा विवेकी आवाज विरत जाणं ही एक मोठीच समस्या आहे. त्यामुळेच – ‘माझ्यासोबत किंवा माझ्याविरुद्ध’ अशी काळी-पांढरी विभागणी सरसकटपणे करून टाकण्याच्या काळात ‘माणसासाठी आणि माणुसकीच्याविरुद्ध’ या मूलभूत व समजूतदार ओळखी विसरून जाऊ नये म्हणून लिहिणे - ही एक मोठी जबाबदार कृती ठरते. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून अशा प्रकारचा जागर अपेक्षित असतो. किमान तो जागर घडून येण्याच्या दिशेने काही हालचाली अशा संमेलनांच्या माध्यमातून निश्चितपणे घडून येतात, असं मला वाटतं.
साधारण एकोणीसशे ब्याण्णव-त्र्याण्णव या वर्षी इथे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून या गावाबद्दल मनात जे प्रेम निर्माण झालं, ते आज तीन दशकांनंतरही किंचितसुद्धा कमी झालेले नाही. याचं मुख्य कारण हे, की, हे गाव मुळातच तितका जीव जडण्यालायक, तितका आदर करण्यालायक आहे. ‘गाव’ म्हणजे नुसती गावातली देखणी घरं, आखीव लांबरुंद रस्ते, विजेचे प्रकाशमान खांब, दुकानांच्या लखलखत्या पाट्या आणि नगर परिषदेतला गावाचा नकाशा, वगैरे नसतं. ‘गाव’ म्हणजे गावातली माणसं असतात. नदीसारखी जिवंत खळाळती, हळवी किंवा उग्र, ठाम आणि तरल, स्वत:चा संसार नेटका करून गावाचं भलं चिंतिणारी कणखर आणि सज्जन माणसं. कला-साहित्यात रमणारी रसिक आणि समाजकारणात नीतिमत्ता जोपासणारी माणसं. काही भली, काही वाईटही. अशा सगळ्या माणसांनी गावाला ‘गावपण’ दिलेलं असतं. माणसांनी, माणसांच्या वैयक्तिक-सार्वजनिक वर्तन-व्यवहारांनी, चरित्र-चारित्र्याने गावाचं एक ठळकपणे जाणवेल असं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं असतं. अंबाजोगाईपुरता विचार केला, तर इथे अशी विराट उंचीची माणसं होऊन गेली, आजही आहेत, ही गोष्ट या गावाबद्दल प्रेम निर्माण करायला पुरेशी आहे. आद्यकवी मुकुंदराजांपासून, ‘पासोडी’कार दासोपंतांपासून, प्रखर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थांपासून, विराट ताकदीचे कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी आणि सुस्मृत रामकाका मुकद्दम, एकनाथराव गुरुजी, प्रा. शैला लोहिया; उर्दूतले कवी वफा साहेब, कवितेसोबत वैचारिक लेखनही मागे ठेवून गेलेले शाकेर अहमदपुरी; रा. द. अरगडे, त्र्यंबक आसरडोहकर, सूर्यकांत गरुड, प्राचार्य संतोष मुळावकर, मंदाताई देशमुख, डॉ. ए. बी. देशपांडे आणि नंतरच्या काळातल्या बलभीम तरकसे, डॉ. श्रीहरी नागरगोजे, गणपत व्यास, प्रा. कमलाकर कांबळे, दगडू लोमटे, दिनकर जोशी, प्रा. मुकुंद राजपंखे, सुधीर धावडकर, विश्वंभर वराट गुरुजी, प्रा. अरुंधती पाटील, डॉ. शुभदा लोहिया, प्रतिभा देशमुख, प्रा. शैलजा बरूरे, प्रा. वैशाली गोस्वामी, प्रा. अलका तडकलकर, अनुपमा मोटेगावकर, निशा चौसाळकर, प्रा. भगवान शिंदे, प्रा. विष्णू कावळे, विद्याधर पांडे, गोरख शेंद्रे, अमृत महाजन, नामदेव गुंडाळे, ते अगदी अलीकडच्या पिढीतले अतिशय विचक्षण असे लेखन करणारे गोपाल तिवारी आणि उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेले अलीम अजीम; आणि संध्या सोळंके-शिंदे, तिलोत्तमा पतकराव यांच्यापर्यंतच्या अनेकानेक सशक्त कवी-लेखकांपर्यंतची, सुस्मृत माणिकराव संघई यांच्यासारख्या गायक आणि शंकरराव पांडे यांच्यासारख्या कमाल तबलावादक असलेल्या गायक-संगीतकारांची, सौ. ललिता मुकद्दम किंवा डॉ. दिलीप घारे, संजय सुगावकर, प्रा. संपदा कुलकर्णी यांच्यासारखे अप्रतिम नाट्यकलावंत, राजकारणात उच्चतम नैतिकतेचे मानदंड स्थापित केलेले माजी खासदार बाबासाहेब परांजपे आणि माजी खासदार कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे, नितांत तळमळीने समष्टीविषयक मूलभूत काम उभे करणा-या डॉ. द्वारकादासजी लोहियांसारख्या, अमर हबीब यांच्यासारख्या कृतीशील साहित्यिक-सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतची ही मांदियाळी या गावाला एक कमालीचा नैतिक, सांस्कृतिक आणि अत्यंत आदरणीय असा चेहरा बहाल करत आलेली आहे.
अशा माणसांनी भारलेलं कुठलंही गाव सुंदरच असणार अतोनात!
वर्षभर घडवून आणले जाणारे कार्यक्रम, अनेक संस्था आयोजित करत असलेली व्याख्याने, संगीतसभा, कवी-संमेलने, हे आपल्या गावाचं विशेष सांस्कृतिक धन आहे. आणखी कुठल्या गावात इतक्या मोठ्या संख्येने सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होत असल्याचं निदान माझ्या ऐकिवात नाही. या संदर्भात मुद्दाम उल्लेख करावाच लागेल असा इथला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह! सुजन राजकारणी असलेल्या सुस्मृत भगवानराव लोमटे यांच्या पुढाकारातून चालू झालेल्या आणि मागच्या तीन दशकांपासून दगडू लोमटे यांनी महाराष्ट्रभर एकहाती नावारूपाला आणलेल्या या समारोहाने या सबंध शहरावर, इथल्या पुढच्या-पुढच्या पिढ्यांवर कला-साहित्य-संगीताचे अक्षरश: संस्कार केलेले आहेत. महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर भारतीय पातळीवरच्या कित्येक ख्यातकीर्त साहित्यिकांना, विचारवंतांना, पत्रकारांना, शास्त्रीय गायकांना, वादकांना मी इथे ऐकलं. व्यक्तिश: माझ्या सांस्कृतिक घडणीमध्ये या समारोहाचाही खूप मोठा वाटा आहे, हे मला आवर्जून सांगावेच लागेल.
या गावात, इथल्या स्वाराती महाविद्यालयात शिकायला आल्यावर मला सगळ्यात जास्त भारी काय वाटलं असेल, तर ते तिथलं ग्रंथालय! वाचनालयांचं, ग्रंथालयांचं, पुस्तकांचं जग ही मला नेहमीच अद्भुत गोष्ट वाटत आलेली आहे. इथे येण्यापूर्वी माझ्या गावातल्या एकुलत्या ग्रंथालयाचाही मी सदस्य असायचो. पण ते फारच छोटं ग्रंथालय होतं. पुस्तकांची दोनतीन कपाटे होती फक्त. साम्यवादी कार्यकर्त्यांनी स्थापन केलेलं असल्यामुळे त्यात अर्धंअधिक अनुवादित रशियन साहित्य असे. आणि बाकीची गोष्टीची पुस्तकं! कथा, कादंबरी वगैरे सगळीच पुस्तकं त्याकाळी माझ्या लेखी ‘गोष्टी’चीच पुस्तकं असत. (ते बरोबरही होतंच. ‘गोष्ट सांगणं’ हीच काहीही लिहिण्यामागची मुख्य उर्मी असते.) ही पुस्तकं सहसा बाबा कदम, सुहास शिरवळकर, व.पु.काळे अशा लोकप्रिय लेखकांची असत. अर्थात तिथेच मी काही फार ‘क्लासिक’सुद्धा वाचलंच होतं. त्या चिमुकल्या ग्रंथालयाने माझ्यातला ‘वाचक’ तयार करण्यात फारच मोठा वाटा उचललेला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे स्वाराती महाविद्यालयात आल्यावर आणि महाविद्यालयातल्या ग्रंथालयाचा जबरदस्त आवाका लक्षात आल्यावर मी हरखून गेलो नसतो, तरच नवल होतं. मला हवं ते पुस्तक तिथे मिळायचंच. मी तिथे वाट्टेल ते वाचलं. कथा, कविता, कादंबरी यातलं जे मिळेल ते! कुणाला अतिशयोक्ती वाटू शकेल, पण त्या काळात मी जवळजवळ रोज एक पुस्तक वाचून काढायचो. ‘भाषा’ आणि ‘साहित्य’ या काय ‘कमाल’ गोष्टी असतात, याची मला त्याच काळात प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली होती.
‘अनुभव घेणं’ हा ‘शहाणं’ होण्याचा एकमेव मार्ग असतो. आणि ‘वाचन करणं’ हा अनुभव घेण्यासाठीचा एक अतिशय महत्वाचा मार्ग! आपल्या जगण्यापलीकडचे, आपल्या परिघाबाहेरचे, कल्पनातीत अनुभव आपण केवळ वाचनातूनच मिळवू शकतो.
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर तिथल्या ग्रंथालयाचा संबंध संपला आणि वाचनाच्या बाबतीत मला एकदम उपासमारीसारखी जाणीव व्हायला लागली. मग मी नगर परिषदेच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालया’चा सदस्य झालो. काही वर्षांनी ‘साहित्य निकेतन’ या ग्रंथालयाचा सदस्य झालो. ‘वाचक’ म्हणून, ‘लेखक’ म्हणून मी आजवर जो काही थोडाफार घडलो असेन, त्यात या तिन्ही ग्रंथालयांचा सिंहाचा वाटा आहे.
आपण वाचायला लागतो, आणि काहीएक काळ उलटल्यावर आपणही काही लिहून पाहावं, असं आपल्याला वाटायला लागतं. वाचना-लेखनातला हा एक अपरिहार्य असा सहसंबंधच आहे. ‘चांगला वाचक हा संभाव्य लेखक असतो’, असं नेहमीच म्हटलं जातं. त्याच न्यायाने कधीतरी मीही लिहायला लागलो असेन.
मागे एकदा, एका नियतकालिकासाठी, ‘मी का लिहितो?’ अशा शीर्षकाचा लेख लिहायचा असताना या प्रश्नांच्या उत्तरात आपण काय-काय सांगू शकू, असा विचार करायला लागलो, तेव्हा आधी मला वाटलं, हा काय प्रश्न होऊ शकतो काय? एखादा माणूस एसटीत कंडक्टर होऊन निव्वळ चिल्लर पैशांपायी प्रवाशांशी वाद घालत आयुष्यभर हिंडत राहतो तो कशासाठी? किंवा कुणी एमेसीबीमध्ये लाईनमन हौसेनं झालेला असतो का? नसतो. त्याला ते-ते तसं-तसं करत राहावं लागतं, कारण ते करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा काही उपाय उरलेला नसतो. ‘लिहावंसं का वाटलं?’ या प्रश्नाचंही हेच उत्तर असू शकतं. लिहिण्यापलीकडे आपल्याजवळ दुसरा काही उपायच उरलेला नाही, म्हणूनच केवळ मी लिहितो, असंच तो विचार करताना अखेरीस माझ्या लक्षात आलं.
अखेरीस म्हणजे अगदी अलीकडच्या काळात. या पंधरा-वीस वर्षांत. त्यापूर्वीही आठ-दहा वर्षे मी लिहित होतोच, पण ते खरोखर ‘लिहिणं’ होतं असं मला आता वाटत नाही.
म्हणजे खूप वर्षांपूर्वी मी एक कविता लिहिलेली मला आठवते. तिच्यात कुणा अनामिकेला उद्देशून ‘तू आयुष्यात येशील, तर जन्माच्या उन्हाचं लख्ख चांदणं होईल..’ अशा दोन ओळी होत्या. आता हे ‘जन्माचं उन्ह’ वगैरे मी लिहिलं, पण या उन्हाचा मला तेव्हा कसलाही अनुभव नव्हता. विशीच्या आतबाहेर माझं वय असेल, तेव्हा मी हे लिहिलं होतं. त्या वयात ‘वयाची’ अशी काहीएक मागणी असते, त्यातून या असल्या कविता लिहिल्या जातात. अख्ख्या जन्माचं उन्ह व्हावं असलं काहीच माझ्या आयुष्यात तेव्हा घडलेलं नव्हतं. ना माझा प्रेमभंग झालेला होता, ना कुणाच्या नादात माझं आयुष्य दिवाळखोर झालेलं होतं. मग हे ‘जन्माचं उन्ह’ माझ्या लिहिण्यात आलं कुठून?
बहुधा कुणाच्या तरी आवडलेल्या प्रेमकवितेच्या अनुकरणातून ते आलेलं असणार.
ही कविता, यातली तरल भावना, शब्दकळा, मला आजही आवडणारी असली तरी आज मी या लेखनाकडे पाहतो तेव्हा मला ते कमालीचं कृतक वाटतं. अशा प्रकारच्या शे-शंभर कविता मी तेव्हा आणि त्यानंतरच्या काही वर्षांत लिहिल्या असतील. ‘आपण कवी आहोत’, असं मला त्यावेळी वाटायचं.
आज विचार करतो तेव्हा मला उमगतं, की, मी तेव्हा ‘कवी’ नव्हतो. त्या कविता लिहिणं हे निव्वळ काही वयसुलभ संवेदनांना शब्दांत बांधणं होतं. कविता लिहिण्यातला सुरुवातीचा अनुकरणाचा, स्व-सुखावणारा, त्या वयातल्या मानसिक, शारीरिक आणि अर्थातच सुप्त लैंगिकही भावनांना वाट करून देणा-या त्या काल्पनिक प्रेमकविता आणि अनेक निसर्गपर वगैरे असलेल्या रम्य कविता लिहिण्याचा असा काही काळ गेल्यानंतर, हळूहळू माझ्या असं लक्षात येऊ लागलं की माझ्या दुष्काळी भोवतालात ज्याला ‘निसर्ग’ म्हणतात तसलं काहीही नाही आणि ज्याला ‘प्रेम’ म्हणावं असंही काही नाही. माझ्याभोवती विदीर्ण करून टाकणारं दारिद्र्य आहे, नेमाने येणारा दुष्काळ आहे, कोरडा ओढा आहे, आटलेल्या विहिरी आहेत, दरसाल उध्वस्त होणारा कुणबी आहे, तहहयात वेदनांच्या जत्रांनी ज्यांच्या भाळावर पालं ठोकलेली आहेत अशा अश्राप बायका आहेत, आणि कसलाही आशादायक भविष्यकाळ नसलेल्या माझ्यासकट जगण्यातून मुळं उखडलेली माझी पिढी आहे, याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. काल्पनिक पानाफुलांवर – नद्याडोंगरांवर आणि काल्पनिकच सुबक ठेंगणीवर कविता लिहिणे ही आपल्या भोवतालाशी केलेली प्रतारणा ठरेल, हे हळूहळू माझ्या आत मला उमगत गेले. मला वाटलं, माझ्या सभोवतीच्या निव्वळ भुईसरपट जगण्यातला कोलाहल, त्यातले स्तर, त्यातल्या व्यथा माझ्या कवितेनं मांडायला हव्यात. आधीची मघाशी मी उद्धृत केलेली कवितेची ओळ कुणा मुलीबद्दलची भावना सांगणारी होती. नंतर कधीतरी माझ्या लक्षात आलं की जिच्या स्मरणाचं अत्तर व्हावं अशी कुणीही मुलगी आपल्या आयुष्यात तोपर्यंत कधीही प्रत्यक्ष आलेली नव्हती, त्याअर्थी आपण लिहिलेली ही कविता हा केवळ आपल्या कल्पनाशक्तीचाच पुरावा आहे.
माझ्या भोवतालात त्यावेळी कशा प्रकारच्या मुली, किंबहुना कशा अवस्थेत जगणारी एकूणच स्त्री-जात होती?
बायकांना छळणारे अनेक पुरुष माझ्या भोवतालात होते आणि तो छळ निमूट सोसत राहून आयुष्यभर मनात कणाकणाने जळत राहणा-या असंख्य स्त्रिया तिथे होत्या. या छळ करणा-यांत माझे गावकरी, माझे शेजारीपाजारी, माझ्या स्वत:च्या आणि भोवतालातल्या यच्चयावत घरांमधले बाप, चुलता, मामा वगैरे पुरुष होते आणि सोसणा-यांत घराघरातल्या आया, चुलत्या, माम्यांसकट हजारो बायका होत्या.
या बायकांच्या काळोख्या जगण्याबद्दल आणि त्यांच्या जन्माच्या भाळावर रेखलेल्या नागासारख्या जहरी पुरुषांबद्दल बोलणारी एक कविता मी नंतर कधीतरी लिहिली-
‘जन्म काळा’ असं तिचं शीर्षक आहे. –
रात्र काळी,
घागर काळी.
रान काळं,
डोह काळा.
जातं काळं,
तवा काळा.
चूल काळी,
धूर काळा.
कपाळ काळं,
गोंदण काळं.
आभाळ काळं,
माती काळी.
चोळी काळी,
ठुशी काळी.
साज काळा,
संग काळा,
सोस, बाई,
भाळावरती,
लख्ख जहरी,
नाग काळा!
ही कविता आता वाचतो, तेव्हा मला वाटतं की आपण काही प्रमाणात का होईना ‘कवीपण’ पेलून धरण्याचा प्रयत्न केला आहे. आता मला असंही वाटतं, की आपण ‘कवी’ असतो तेव्हा आपण केवळ ‘प्रेमकवी’ असणं गरजेचं नसतं. कवितेने स्वत:च्या किंवा लोकांच्या सुखांची किंवा त्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी घ्यायची फार काही आवश्यकता नाही. सुखाची कविता करायला हरकत नाहीच; इथल्या माणसांच्या दुखण्यांवर बोट ठेवून ते जगाच्या वेशीवर टांगण्याची गरज अधिक आहे. हे दुखणं आपण असं वेशीवर टांगत राहिलो तर त्यातून कुणाच्या तरी आतल्या संवेदनेला, सहवेदनेला हाकारता येणं, जागवता येणं शक्य होऊ शकतं.
मला वाटतं, आसमंतातल्या सर्वस्तरीय जखमांबद्दल कवी-लेखकांनी बोलणं आवश्यक असतं. ज्या प्रकारचा काळ आपल्याभोवती वस्तीला आलेला आहे, त्याची नोंद घेणं, हे कवी म्हणून आणि आता मागच्या काही वर्षांत कथालेखक म्हणूनही मला सदैव महत्वाचं वाटत आलं आहे. अनेक अर्थांनी अतीव संक्रमणाचा असलेला हा काळ साहित्यातून वाचकांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचला तर त्या पिढ्या ज्या ‘भुई’वर उभ्या असतील, त्या भुईची घडण त्यांच्या लक्षात येईल.
एक काळ असा होता की एकूणच साहित्यक्षेत्रात अभिजन लेखकांचा आणि अनुषंगाने अभिजन वास्तव्य करतात, त्या भू-सांस्कृतिक पर्यावरणाचाच वरचष्मा होता. म्हणजे गो. नी. दांडेकरांची ‘पडघवली’ किंवा श्री. ना. पेंडसेंची ‘तुंबाडचे खोत’ सारखी एखादी प्रसिद्ध कादंबरी वाचली तर कोकणस्थ ब्राम्हणांच्या माजघरात काय पद्धतीचं वातावरण असे किंवा ‘खोत प्रथा’ काय होती, ‘सड्यावर जाणं’ म्हणजे नेमकं कुठे जाणं किंवा वाहत्या ओहोळाला तिकडे ‘प-ह्या’ म्हणतात, हे मला माहीत व्हायचं. जगबुडीची पूजा किंवा कथित अभिजन घरांतली डोहाळजेवणाची गाणी कसली असत, तेही मला माहीत व्हायचं. पण धर्माने हिंदू असलेले मराठवाड्यातले शेतकरी सणावाराच्या दिवशी गावातल्या दर्ग्यातल्या मुसलमान पीरांना नैवेद्य का पाठवतात हे, किंवा आपल्या शेजारच्या घरातला कुणबी किंवा शेतमजूर किंवा गावगाड्यातला बलुतेदार पिढ्यानपिढ्या कशा प्रकारच्या संघर्षाला सामोरा जातो आहे, हे मला साहित्यातून समजून घ्यायचं असेल तर ते नेमकं वास्तवदर्शी स्वरुपात उपलब्धच नसे. मी सामान्य वाचक होतो, म्हणजे एका ठराविक पर्यावरणातलंच मला वाचावं लागत असे. अर्थात याला आक्षेप नाहीच. कारण त्या साहित्यातून ठळक होणारं पर्यावरण परदेशीय नव्हतं किंवा त्या पर्यावरणाशी आपण वैर मांडावं असंही काही नव्हतं. त्या संदर्भात फक्त एकच गोष्ट होती की ते फारच मर्यादित, फारच थोडक्यांच्या जगाबद्दल बोलणारं होतं. मराठी साहित्यात दीर्घकाळ प्रकट होत असलेलं ते सांस्कृतिक पर्यावरण अनेक अर्थांनी एकारलेलं होतं. कारण त्यात त्या पलीकडच्या खूप विशाल समूहाच्या जगण्याबद्दल, त्यातल्या ताणांबद्दल काहीही फारच क्वचित आलेलं असे.
मी जेव्हा व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांचं किंवा बाबुराव बागुल, दया पवार, लक्ष्मण माने, माधव कोंडविलकर किंवा भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजन गवस, राजन खान यांचं लेखन वाचलं, तेव्हा मला वाटलं की यातलं खूपसं आपल्याही भोवतालाबद्दलचं आहे. आपण लिहायचं असेल तर असंच काहीतरी लिहायला हवं. मग नंतर माझ्या लक्षात आलं या लेखकांनी जे लिहिलं आहे, जी माणसं चितारली आहेत, ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातला काळ आता सरून गेलेला किंवा सरत चाललेला आहे. त्यांनी ‘त्यांच्या काळाबद्दल’ लिहिलं होतं. आपल्याला काही लिहायचंच असेल तर आपण ‘आपल्या काळाबद्दल’ लिहायला पाहिजे.
आपला, माझा काळ म्हणजे कोणता काळ?
मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भारताने जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या दालनात प्रवेश केला होता. चार-सहा वर्षांचा काळ गेला आणि त्याचे दृश्य परिणाम दिसायला लागले. यापूर्वी कधी नव्हत्या एवढ्या आक्रमकपणे बाजारयंत्रणा घरात घुसल्या. टीव्ही चॅनेल्समधून प्रचंड हिंसा आणि बीभत्स लैंगिक अविष्कार घराघरात घुसले. मोबाईल्सच्या निमित्ताने जग मुठीत आल्याची भावना निर्माण झाली. बंगल्यांसाठी, गाड्यांसाठी चोवीस तासांत कर्जपुरवठा होऊ लागला आणि याच बॅंका पेरणीसाठी लागणा-या दहापाच हजारांसाठीही शेतक-यांना जवळ येऊ देत नाहीत, हे चित्र ढळढळीतपणे समोर येऊ लागलं. भूमिहीनांच्या समस्यांचं स्वरूप बदललं आणि बलूतेदारांसारख्या इतर श्रमजीवींच्या रोजगाराचे पारंपारिक व्यवसाय क्रमश: मोडकळीला येत गेले. एका बाजूला हे, आणि दुस-या बाजूने याच काळात ऋतूचक्रामध्ये अत्यंत विषम स्वरूपाचे बदल झाले. ‘ग्लोबल वार्मिंग’ सारख्या कधीही न ऐकल्या-बोललेल्या गोष्टी गावाच्या वेशी ओलांडून आत आल्या. शेकड्यांच्या संख्येत दरवर्षी शेतकरी आत्महत्या घडू लागल्या. गावठी पुढा-यांनी राजकारणाचे अड्डे बनवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमधून नीट वाचता-लिहिताही येत नसलेल्या पदवीधरांचे तांडेच्या तांडे जन्म घेऊ लागले आणि ‘पर्मनंट बेकार’ या नव्या समाजघटकाची लोकसंख्या बेफाट वाढू लागली. वाढत्या शहरीकरणाने, ढासळत्या कृषिजीवनाने आणि सर्वव्यापी होऊ घातलेल्या तांत्रिक प्रगतीने आणखीही अनेक दृश्यादृश्य ताण भोवतालात प्रकटलेले आहेत. एकीकडे जीडीपी आणि भौतिक-आर्थिक प्रगतीच्या चर्चा घडत असतानाच दुसरीकडे सामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यातली गुंतागुंत कमालीची अस्वस्थ करणारी ठरते आहे. मागच्या दोन-तीन दशकांपासून धार्मिक-जातीय विखारांचे प्रचंड टोकदार भाले आपल्या आसमंताला भोसकत असल्याचे मी पाहत आलो आहे. हे पाहताना मला वाटत आलं, की माझ्या पिढीच्या लेखकांनी हे सगळं जगासमोर मांडायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भोवतालातल्या व्यथांना आपल्या लिहिण्यातून वाचा फुटायला हवी. हे आणि असे बरेच काही मनात रुजत गेले आणि त्यानंतर मग मला भान आलं की आपण अधिक गंभीरपणे लेखणी झिजवायला हवी आहे.
माझ्या कवितेतून आणि इतर गद्य कथात्म-लेखनातून मी या गोष्टी नोंदवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. आता, या मानसिक टप्प्यावर, स्वत:ला सुखावण्यासाठी, ‘लेखक’ हे सन्मानाचं बिरूद मिरवता यावं यासाठी, किंवा त्या अनुषंगाने मिळणारे लहानमोठे लाभ मिळवण्यासाठी लिहावं असं मला वाटत नाही. मी लिहितो, कारण हे मी लिहिलं नाही, तर मला स्वत:शी, स्वत:च्या काळाशी प्रतारणा केल्यासारखं वाटत राहील. ‘मी लेखक आहे’ असं आपण म्हणत असू तर आपल्या हाती असलेलं ‘शब्द’ हे साधन वापरून आपण जगाला अधिकाधिक ‘मानवी’ करण्याचा प्रयत्न करायला हवा. निव्वळ कल्पनेचे, निव्वळ शब्दांचे खेळ करण्यात काही अर्थ नसतो.
नुसत्या माझ्या स्वत:च्या भौतिक भोवतालातच नव्हे, तर एकूणच व्यापक सामाजिक परिप्रेक्ष्यात आपल्या चौफेर आसमंतात जे अमानवी तत्व रुजत चालल्याचं चित्र मागची काही वर्षे इथे दिसत आहे, त्यावर आपण बोलायला-लिहायला हवं, असं आज मला वाटत असतं. प्रसंगी धोका पत्करूनही ते लिहायला हवं, असंही.
घरापासून काही अंतरावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं, घराच्या अंगणात कॉ. गोविंद पानसरेंचं आणि घरात घुसून डॉ. एम.एम. कलबुर्गींचं राजरोस रक्त सांडलं जात असेल, तर मला वाटतं, माझ्या कमी-अधिक शक्तीनुसार त्या हिंसेच्या विरोधात मी निदान बोलायला तरी पाहिजेच. आणि लेखक म्हणून हे ‘बोलणं’ मी लिहून बोलायला हवं. लेखी शब्दांवर अजूनही जबाबदारीचं नैतिक बंधन उरलेलं आहे. लेखी शब्दांवर अजूनही लोकांचा विश्वास असलेला दिसतो. शिवाय ‘लिहिणं’ ही कृती नुसत्या बोलण्यासारखी एका क्षणात वा-यावर विरून जाणारी नसते. लिहिण्याच्या कृतीला थोडंसं अधिक आयुष्य लाभतं, त्यामुळे ती कृती इतरांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचू शकते.
मग मी कविता लिहिली-
- मग एक गोळी आली, मस्तक भेदून गेली,
मग आणखी एक गोळी आली, आणखी मस्तक भेदून गेली,
मग आणखी गोळी, आणखी मस्तक.
मग, हे कुणी केलं याचा तपास चालू झाला, होत राहिला, संपलाच नाही कधी.
मग ते म्हणाले,
अमुकतमुक बोलणारी आणखी मस्तके आली तर आमच्याकडे आणखी गोळ्या आहेत,
पुढचा नंबर अमुकतमुक यांचा.
मग, हे कोण म्हणाले याबाबत तपास चालू झाला, होत राहिला, संपला नाही कधीच.
मग, त्यांनी झाल्या नंबरावर फुली मारली, आणि,
पुढच्या नंबराभोवती लाल रंगाचं धमकीवजा वर्तुळ आखलं.
त्याचे सूचनावजा फोटोसुद्धा ‘जनहितार्थ’ जाहीर केले त्यांनी.
मग हे कुणी केलं याबाबत तपास चालू झाला, होत राहिला, प्रथेप्रमाणे तोही संपला नाही कधीच.
मस्तक पुस्तक लिहू शकतं, तशा गोळ्याही तयार करू शकतं,
गोळ्या पुस्तक लिहू शकत नाहीत, मस्तक घडवणं तर नाहीच नाही,
हे, ते सगळेजण विसरले आहेत.
खेळ रंजक आहे. त्याहून अधिक धोकादायक आहे.
तटस्थ कुंपणावरून मी उतरायला हवं आता.
गोळ्यांची संख्या अपुरी होत होत त्या संपूनच जातील, एवढी,
मस्तकांची संख्या आता वाढवायला हवीय.
आणि हे मी तुम्हाला सांगत नाहीय,
हे मी मलाच सांगण्याची कधी नव्हे एवढी निकड निर्माण झाली आहे.
मी, माझं, ऐकायला हवंय आता!
इतक्या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त घडत असतात भोवतालात, की त्यांच्याबद्दल न लिहिणं म्हणजे त्या भोवतालाशी आपण केलेली प्रतारणाच असते. शिवाय जगण्याला शब्दमर्यादेच्या बंधनात अडकवणं हेही मला जुलमी वाटतं फार. ‘नुसतं जगणं’ ही खरी महत्वाची गोष्ट. जगण्याच्या कक्षा कशाकशालाही न जुमानता दिवसेंदिवस इतक्या स्वैर विस्तीर्ण होत चालेल्या असताना पाच किंवा पन्नास शब्दांची कविता किंवा पाचशे किंवा हजार शब्दांची कथा लिहून आपण त्यातल्या कशाकशाचा वेध घेणार? पण हा वेध घेणं गरजेचंच असतं. जगण्याकडे पाहणं, ते समजून घेणं या गोष्टी करायच्या असतील तर हा वेधही घ्यावाच लागणार.
आणि हा वेध अगदी पक्केपणाने घ्यायचा तर लिहिण्यासंदर्भात आपली काहीतरी एक निश्चित भूमिका, लिहिण्याच्या विषयांच्या संदर्भातले काहीएक प्राधान्यक्रम आपल्या मनात असायला हवेत. ‘जीवनासाठी कला, की कलेसाठी जीवन’ वगैरे वाद आता फार जुने झाले, पण काही वेगळ्या गोष्टींबद्दल अजूनही साहित्यजगतात बोललं जातं. उदाहरणार्थ ‘कल्पित साहित्य’ आणि ‘वास्तववादी साहित्य’ हा भेद हल्ली अनेकदा ब-यापैकी चर्चेत असतो.
मागच्या काही वर्षांत मी कथालेखनाकडे वळलो, तेव्हा या ‘कल्पित / रचित’ आणि ‘वास्तववादी’ या प्रकारांपैकी कशा स्वरूपाचं आपण लिहायला हवं, याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नव्हती.
मला माझ्या भोवतालाबद्दल, माझ्या माणसांबद्दल लिहायचं होतं. किती हजार प्रकारचं जगणं माझ्या भोवतालात आहे याची जाणीव मी त्याकडे लिहिण्याच्या दृष्टीने पाहायला लागल्यावर मला होते.
मी म्हणतो, कशाबद्दल लिहूयात आपण? मलाईदार राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक जग की यापलीकडे उरणारं मूलभूत जगणं? म्हणजे आपण देश महासत्ता होण्याबद्दल लिहूयात की गावातल्या बारमाही कोरड असलेल्या हापशावर? आपण नोटाबंदीवर लिहूयात की ज्यांच्या खिशात नोटाच नसतात त्यांच्याबद्दल? उंचावणा-या जीडीपीबद्दल की अवकाशव्यापी बेकारीबद्दल, चिंबओल्या दुष्काळाबद्दल की कभिन्न कोरड्या अवकाळाबद्दल? आठ दिवसात पाचपाचशे कोटींचा धंदा करणा-या सिनेमांबद्दल की रोज सकाळी मजूरअड्ड्यावर काम मिळवण्याच्या आशेने उभ्या राहणा-या अशक्त कष्टक-यांबद्दल? रोज संध्याकाळी चारशे रुपयांची मद्याची बाटली न कचरता शंभर रुपयांच्या चखण्यासकट घेणा-या आणि दुधाचा भाव पाच रुपयांनी वाढल्याबद्दल ओरड करणा-या, बाजारव्यवस्थेतल्या दलालांनी टोमॅटोचा भाव दहा पैसे किलोवर आणल्यावरही तो पाच पैशांतच मिळावा म्हणून घासाघीस करणा-या पांढरपेशांबद्दल लिहूयात, की शेतक-यांच्या जीवाचं राजकारण करून सत्तेच्या मखरात जाऊन शोभिवंत होणा-या राजकारण्यांबद्दल? माध्यमांच्या व्यभिचारावर की समाजमाध्यमांच्या उठवळपणावर? कायदे करण्याची आणि ते सांभाळण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते त्या लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरीवर की धंदेवाईक समाजसेवी एनजीओजच्या बेगडी करुणेवर? निगरगट्ट व्यावसायिक कीर्तनकारांवर की गल्लीबोळात सुळसुळाट झालेल्या पैशात विकल्या जाणा-या अर्वाचीन प्रवचनकारांवर? राष्ट्रीय राजकारणावर की त्याहून खतरनाक मुत्सद्दी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर? कालपर्यंत निरंकुश सत्ता उबवत असलेले लोक आज सत्ता गेल्यावरच उभ्या करतात त्या कथित जनहितार्थ संघर्षाच्या नौटंकीवर? कथित साधूने केलेल्या बलात्कारावर की उघड सत्तांधांनी घडवलेल्या दंगलींवर? उच्चशिक्षित बायकोवर तितकाच उच्चशिक्षित नवरा करतो त्या छळवणूकीवर की सडकछाप गुंड एखाद्या कोवळ्या मुलीच्या करतात त्या सरेआम दाहक छेडछाडीवर? शेतकरी नेत्यांच्या लाल दिव्यावर की अधांतरी कुणब्याच्या गळ्यातल्या फासावर?
लांबतच जाणारी यादी आहे ही. हनुमानाच्या शेपटीसारखी. नोंदी कराव्यात तेवढ्या कमीच. वर्तमान हा अशा सगळ्या क्रूर विसंवादाची गोफण झालेला आहे. या गोफणीतून अनवरत भिरकावले जाणारे टणक दगड आणि त्या मा-याने सातत्याने रक्तबंबाळ होत जाणा-या समाजपुरुषाचं चरित्र रेखाटायचं तर लिहिणं भाग आहे. माझ्या काही कथांमधून मी जाणीवपूर्वक याबद्दल लिहिलं आहे. ‘लिहिणं’ ही कृती कितीही व्यर्थ वाटणारी आणि दुर्लक्षित झालेली असली तरी लिहिणं भाग आहे, कारण घटितांचे अन्वय नेहमी अक्षरांनीच नेमकेपणाने लावले गेले आहेत. हिंसेला शौर्याचा कितीही मुलामा दिला तरी तलवारींनी निर्माण केलेला इतिहास माणुसकीचा नसतोच कधी. इतिहासाला अर्थ देण्याचं आणि उन्हातल्या वर्तमानाच्या माथ्यावर छत उभं करण्याचं काम नेहमी लेखणीनेच केलेलं आहे. लेखणीला दुसरा पर्याय असू शकत नाही.
ज्ञानेश्वरांना आठवा, किंवा तुकारामांना डोळ्यांसमोर येऊ द्या; म्हणजे लेखणीचं मोल लक्षात येऊ शकेल.
‘लेखणीला राबवत राहणं’ हा एक महत्वाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक हस्तक्षेप असतो. व्यवस्थेनं कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं, तरी लिहित्या माणसांनी हा हस्तक्षेप पुरेशा गांभीर्याने करत राहणं आवश्यकच आहे. ‘अक्षर’ समाज निर्मितीमध्ये अक्षरांइतकी ताकद दुसऱ्या कशात असते?
समाजाच्या प्रश्नांवरील लढाया जेव्हा संसदेत अशक्य होतात आणि रस्त्यावर त्यांना प्रभावी नेतृत्व मिळत नाही, त्यावेळी एखादी कविताच नेता बनून लोकांच्या ओठांवर खेळत असते. एका तुरुंगात कैद्यांना मूल्यशिक्षण व धार्मिक नीतीनियम सांगण्याच्या कामावर असलेला एखादा ‘फैझ अहमद फैझ’ लिहून जातो ‘हम देखेंगे..!’, आणि ते गाणं तुटून दुसरीकडे राहिलेल्या हिश्श्यातल्या देशात चळवळ बनून समोर येतं – ही चांगल्या साहित्याची शक्ती असते.
साहित्याच्या वाचन-आकलनासह त्याचा मोठा प्रभाव माणसाच्या आणि समाजाच्याही भावनिक घडणीवर होतो. तसा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर आपली जडणघडण कायम होतच असते. अचानक घडलेल्या काही घटना समाजजीवनावर गंभीर परिणाम करून जातात. उदाहरणादाखल, एखाद्या गाफील रात्रीच्या बेसावध क्षणी घडून आलेली नोटबंदीसारखी घटना पाहूया.
स्वत:चा हक्काचा पैसा समोर दिसत असूनही तो हातात येत नसणाऱ्या गरीब आणि निम्न-मध्यमवर्गीय लोकांच्या मानसिक आरोग्यात गंभीर बदल त्या काळात घडून गेल्याचे अनेक मानसशास्त्रीय संशोधकांनी नोंदवून ठेवले आहे. पैशांच्या अभावाने मुलींची लग्नं रखडल्याच्या, किंवा ते मोडल्याच्या कितीतरी घटना त्या काळात घडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं वाचलं आहे. आणि सबंध मानवजातीवर शतकातली सर्वाधिक हतबलता लादलेला कोरोनाकाळ घ्या. लक्षावधी माणसांची भयावह स्थलांतरं घडली त्या काळात. पाचशेसातशे किलोमीटर पायी चालून गेलेल्या माणसांना त्यांच्या स्वत:च्याच जिवलग आप्तेष्टांनी गावात प्रवेशबंदी केलेली तेव्हा. बाधितांचे मृतदेह मोजदाद न होता जत्थ्यांनी जाळले किंवा नदीतून वाहवले, असंही दिसलं त्याकाळात. आणि त्याच अभूतपूर्व दिवसांत आपली व्यवस्था टाळ्या वाजवण्यात, थाळ्या बडवण्यात आणि दिवे लावण्यात मश्गुल झाल्याचंही सबंध जगाने पाहिलं तेव्हा. माझ्या टीचभर गावात दोनेक महिन्यात शंभराहून अधिक लोक मरून गेले, त्याच दिवसांत. कधी नव्हे इतकी निर्दयता, भावनाशून्य रखरखीत कोरडेपण आणि निव्वळ ‘वापरून घेण्याच्या’ वृत्तीने प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची सवय सामाजिक-सार्वजनिक स्तरावर मागच्या काही वर्षात अतिशय वाईट पद्धतीने विकसित झालेली आहे. आजच्या साहित्याने, विशेषतः कथात्म अंगाने जाणाऱ्या साहित्यप्रकारांनी या भौतिक-मानसिक आंदोलनांची दखल घेणे मला गरजेचे वाटते. आमदार-खासदारच नव्हे तर समाजशास्त्रज्ञ, पत्रकार इत्यादी मंडळींनाही घाऊक दराने खरेदी करण्याच्या काळात ही जबाबदारी साहित्यिकांवर लेखक-कवींवर येऊन पडते. सबब या नव्या जाणिवांच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बाजू ध्यानात घेऊन गंभीरपणे लेखन करण्याची कधी नव्हे इतकी गरज आज निर्माण झाली आहे.
कसलीही नैसर्गिक भरपाई न करता आडमाप झाडं आणि जंगलं तोडून अपघातांची ‘समृद्धी’ कशी चौपदरी महामार्गांनी डवरून येते, हे आपण पाहत आहोत. देदीप्यमान इतिहासाच्या गोष्टी उगाळत असताना आपण सध्याचा भूगोल (आणि वर्तमानही) ज्या गतीने नासवत आहोत त्यामुळे दुष्काळ, पूर, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती या फार अतिपरिचित गोष्टी झालेल्या आहेत. बुडणाऱ्याला वाचवण्याऐवजी त्याच्या बुडण्याची चित्रफित ‘शूट’ करण्यात गर्क होणारा समाज झालो आहोत आपण. एकाच सामाजिक माध्यमसमूहावर एकाखाली एक येत जाणाऱ्या हार्दिक अभिनंदनाच्या आनंदी उकळ्या आणि भावपूर्ण श्रद्धांजल्यांचे औपचारिक उसासे यांच्या एकत्रित कोलाहलात संवेदनांमधली मूलभूत मानवी ओल आणि उब समग्रपणे लोप पावत चालली आहे. बदलत्या काळात प्रेमाच्या, रागाच्या, द्वेषाच्या, पराक्रमाच्या संकल्पना इतक्या बदलल्या आहेत की अकल्पिताचा शोध घेण्यासाठी परग्रहावर जाण्याची गरज भासू नये. देवाचं आणि धर्माचं विवेकरहित राजकीयीकरण होतं तेव्हा त्या उन्मादात वाहवत जाणाऱ्या जमावाला कुठल्याही काळात कोणत्याही कायद्याची चाड नसते. दैनंदिन आयुष्यात आपल्या रोजच्या भोवतालातली, आपल्या निकटची माणसं रोजच्या रोज भरडली जात असतात त्याचं कोणाला सोयरसुतक दिसत नाही. बोलण्यासाठी घरात कुणीही उपलब्ध नसल्याने पैसे मोजून नाती विकत घ्यावी लागतात हे महाराष्ट्राच्या तथाकथित सांस्कृतिक राजधानीतलंच नव्हे तर गावोगाव सगळीकडेच दिसू लागलेलं वास्तव आहे.
नवी आव्हाने पेलण्याची अवास्तव छप्पन्न इंची भाषा करताना हे कायम लक्षात ठेवायला हवं आहे की लोकशाही मूल्यांची अक्षम्य हेळसांड, विचित्र मॉरल पोलिसिंग, आणि बुद्धिहीन उन्मादाची एक अनंत खाण आपण बनत चाललो आहोत. आपल्याच देशातल्या या किंवा त्या समुदायाला कायम शत्रुत्वाच्या भूमिकेतून पाहण्याच्या दिशेने इतरांना घेऊन जाणं, त्याला वैधानिक मान्यता मिळवून देण्याची भाषा करणं, ही ‘माणूस’ म्हणून आपल्या विचारांचा, जगण्याचा आणि परस्परसंबंधांचा अवकाश संकुचित आणि घातक करणारी गोष्ट आहे. यातून हाती लागणारे अराजक आपण दररोज अनुभवत आहोत. त्याच्या कारणांचा आणि परिणामांचा धांडोळा आजच्या साहित्याने घेणे आवश्यक आहे.
विकृतींच्या उदारीकरणाचा जिथे बाजार मांडला जात असेल तिथे झपाट्याने बदलत जाणाऱ्या गावजाणिवांची कथा कुठेतरी मांडली जायला हवी. केवळ लेखनात नव्हे तर अधिक लोकांपर्यंत पोचू शकेल अशा माध्यमातून ती मांडली जायला हवी. माझ्या ‘गावकथा’ या प्रयोगाच्या संहितेसाठी, ‘दोन जगातला कवी’ या लघुपटाच्या पटकथेसाठी माझे लेखन माझ्या काही मित्रांना सुपूर्द करतानाही मला हीच भावना अधोरेखित करायची होती. आणि तशा मांडणीला मिळणारा प्रतिसाद सामान्य वाचकाला कुठे ना कुठे अंतर्मुख करतच असतो, असाच आमचा त्यातला अनुभव आहे.
रोजच्या दोन जीबी डेटामुळेही नजीकच्या काळात काय काय समस्या उद्भवतील, याची कल्पना करता नाही. मागच्या काही वर्षातल्या विशेषत: तंत्रज्ञानविषयक प्रगतीमुळे (उदाहरणार्थ मागच्या काही महिन्यांत आक्रमकतेने अवतरलेलं AI – Artificial Intelligence) अनेक नवी आव्हाने निर्माण केलेली आहेत. लिहिण्या-वाचण्याची कौशल्ये धोक्यात आली आहेत. ही कौशल्ये माणसाने शेकडो वर्षांच्या परिश्रमांनी साध्य केलेली आहेत. ती एआयने नष्ट होण्याची शक्यता अजिबात अनाठायी नाही आहे. स्मार्टफोन तोंडासमोर धरून बोलत राहिलो की ते आपोआप लिहिलं जातं आहे. ते वाचायचे कष्ट घ्यायचे नसतील तर तो मजकूर तुमच्या कानांत वाचून दाखवला जायची सोय केली जाते आहे. त्यासाठी पुस्तक हात घेऊन बसण्याची गरज उरलेली नाहीय.
पूर्वीपासूनच पट्टीचे वाचक असलेल्या मध्यमवयीन लोकांनासुद्धा आता परत वाचनाकडे वळवणं, हे आता एक आव्हान झालेलं आहे. तरुण मुलांच्या बाबतीत तर हे आव्हान अधिकच कठीण भासणारे आहे. लेखन छापलं जाण्याचा काळ कदाचित लवकरच आता इतिहास जमा होऊ शकेल. आताच डिजिटल प्रकाशित केल्या जाणाऱ्या कथा-कादंबऱ्यांची संख्या लक्षणीय दिसू लागली आहे. डिजिटल माध्यमांमध्ये किंडल वगैरे ठीक आहे, पण समाजमाध्यमांवर जे लेखन होतं तिथे वाचकांनी स्क्रोल करण्याच्या आत मजकूर वाचून होईल अशा प्रकारे लिहिण्याची सवय माझ्यासकट भल्याभल्यांना लागलेली आहे. हे चांगलं आहे की वाईट, याबद्दल चर्चा करता येणे शक्य आहे. पण लेखन-प्रकाशनाचे आणि ते वाचकांसमोर सादर करण्याचे फॉर्म्स बदलण्याचा हा काळ आहे. या काळाला सामोरं जाणं हे नव्या लेखकांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे.
आणखी एक गोष्ट या काळात प्रकर्षाने समोर येते आहे, ती ही, की कवितेचे सार्वत्रिक सुमारीकरण झालेले आहे. ‘कवी आणि त्याच्या कवितेला मिळणारी मान्यता’ यांच्या दरम्यान असलेले ‘संपादक’ आणि मूठभरांच्या ताब्यात असलेली ‘नियतकालिक’ नावाचे अडसर (?) अजिबात दूर झालेले असल्यामुळे ‘आपण लिहू ती कविता’ आणि ‘मिळालेले लाईक्स हीच वाङमयीन मान्यता’ असा काळ आलेला आहे. भाषा, साहित्य, कवितेतले समकालीन किंवा पूर्वप्रवाह यांच्याविषयीचं कणभरही भान नसलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या निर्मिती होत आहेत, हे वाईट आणि ठळक वास्तव आहे. वाईट कविता सगळ्याच काळात लिहिल्या गेलेल्या असतात, पण मागच्या एकदीड दशकात वाईट कवितेचे महापूर आलेले आहेत, हे कुणालाही नाकारता येणार नाही. शंभर वाईट कवितांमधून पाच चांगल्या कविताही येताना दिसतात, एवढीच एक दिलासादायक बाब यात शोधता येईल.
आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीमुळे जग जवळ येत असलं तरी माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत, हे एक अत्यंत ठळकपणे जाणवणारं सामाजिक अवस्थांतर आहे. बिनतारी क्रांतीमुळे आणि समाजमाध्यमांमुळे आता मिश्या फुटण्याअगोदर लोकांना मते फुटताना दिसत आहेत. बहुतेक वेळा कसलंही तारतम्य नसलेली ही मतं काही क्षणांत जगभर उपलब्ध होतात. अशा मतामतांच्या गलबल्यात ठाम विचारांना भेसळीपासून मुक्त राखता यावं किंवा त्या भेसळीतूनही विचारांनी, विवेकाने पुन्हा लखलखत वर यावं, या वर येण्यासाठी अधिक सकारात्मक वैचारिक श्रम करावेत, ही आताच्या काळाची खरी गरज आहे.
कवी-लेखक-विचारवंतांबद्दल, कलावंतांबद्दल कमालीचा अनादर बाळगून असलेल्या लोकांची अतिशय वाढती संख्या, हाही आपल्याकडचा एक गंभीर विषय आहे. अगदी ज्ञानपीठ विजेते लेखक असू देत, त्यांनी कितीही अभ्याससिद्ध विधान करू देत, ते लोकांच्या मनातल्या रूढ भावनेला छेद देणारं असेल तर अतोनात हिंसकपणे त्यांना ट्रोल करणारी जमात फोफावलेली असण्याचा काळ अवतरलेला आहे.
लेखकांबद्दल प्रेम असण्याचा काळ सरून जाऊन, आपण कोण आहोत, आपला अभ्यास काय आणि आपण कुणाला शिव्याशाप देतो आहोत, याबाबत काहीही विधिनिषेध न बाळगणारा समाज अस्तित्वात आलेला आहे.
महेश एलकुंचवारांच्या सप्तक नावाच्या संग्रहात एक गोष्ट आहे – फिनलंडमध्ये सिबेलीयस नावाचे एक मोठे संगीतकार होऊन गेले. एकदा एक अमेरिकन प्रवासी तिकडे त्या शहरात आला आणि त्याला वाटलं की आपण आलोच आहोत इथे, तर सिबेलियसना भेटावं. त्याने टॅक्सी केली आणि सिबेलियसच्या घरी न्यायला सांगितलं, तर टॅक्सीवाला म्हणाला, तुम्ही त्यांची वेळ घेतली आहे का भेटीसाठी? प्रवाशाने नकारार्थी उत्तर दिल्यावर तो म्हणाला, मी नेणार नाही तुम्हाला त्यांच्याकडे. कुणीच नाही नेणार. त्यांच्या एकाग्रसाधनेमध्ये व्यत्यय येऊन नये म्हणून आम्ही कुणीच त्यांना त्रास देत नाही. त्यांच्या घरापासून एक किलोमीटरवरून रेल्वेचे रूळ जात होते. त्यांना गाड्यांचा त्रास होत असेल म्हणून आमच्या सरकारने ते दहा किलोमीटर लांब नेलेयत..’
एलकुंचवार म्हणतात, हा सुसंस्कृतपणा केव्हातरी आपण शिकलो पाहिजे.
हे अर्थातच फार टोकाच्या आदराचं उदाहरण आहे. पण आपल्याकडे काय दिसतं या पार्श्वभूमीवर?
फार विचित्र वातावरण आहे.
आपली बाजू नेमकी कोणती, आपण कुठल्या बाजूने उभे राहायला हवेय, कुठल्या दिशेने प्रवास करायला हवाय, हेच कुणाच्या नीटसे लक्षात येत नाहीय. परस्परविरोधी विचारसरणींचं सहअस्तित्व ही निरोगीपणाकडे वाटचाल करत असलेल्या समाजाची एक महत्वाची अवस्था असायला हवी. परस्पर-सहअस्तित्वाची ही अवस्था परस्पर-शत्रुत्वाच्या भावनेने चिरेबंद होत असेल तर नजीकचा भविष्यकाळ कठीण असणार आहे. विचारसरणींमध्ये परस्परांविरोधी विचारांची द्वंद्वयुद्धे घडावीत, ती वैचारिक पातळीवर! चर्चा, वादसभा उभ्या राहाव्यात आणि त्या मंथनातून काही चांगलं निर्माण व्हावं, हे अधिक चांगलं असेल, की या विचारसरणींचं रुपांतर केवळ या - त्या गटांत व्हावं, या गटांनी एकमेकांना कायम अस्पृश्य मानत राहावं किंवा कायम एकमेकांशी हाणामा-या करत राहाव्यात, हे चांगलं असेल? ‘विचार मरत नसतात.’ या वैश्विक सत्याची प्रवास-परंपरा लक्षात घेतली तर असं लक्षात येतं की चर्चांमधूनच विचार अधिक सर्वसमावेशक होऊ शकतात. विविधतेतून एकता साधण्याचा हाच एक मार्ग असू शकतो, हे आता जगभरात सर्वमान्य झालेले सत्य आहे. एकमेकांबद्दल संशय, मत्सर, द्वेष, अविश्वास अशा भावना मनात बाळगून सकारात्मक दिशेने काहीही घडवणे अशक्य आहे. एखादा ‘ठोस विचार घडणे’ हा एक मोठाच प्रवास असतो. तो पाच-दहा वर्षांत घडेल किंवा शे-पन्नास वर्षे लागू शकतील. अनुकूल किंवा प्रतिकूल अशा कुठल्याही बाजूने त्या विचाराच्या कक्षेत येणा-या सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवेय.
मी स्वत: या गदारोळात कुठे उभा आहे याचा विचार करायला लागल्यावर मला गोंधळून जायला होतं अनेकदा. पण आपण कोणत्या बाजूने उभं राहायला हवंय हे मला माहीत आहे. कुठली बाजू व्यापक अर्थाने चांगली आहे, हे ही मला माहीत आहे. वर्तमानाच्या चारित्र्याचा चेहरा बराच भयावह आहे, हे मला माहीत आहे. तरीही, या अराजकी कोलाहलाकडे मी नांगराने भुई खालीवर करण्याच्या अंगाने पाहतो. खालची माती वर येईल, वरची खाली जाईल आणि काही कसदार विचारांचं शाश्वत पीक यातूनही तरारून वर येईल, अशी मला आशा वाटते.
युद्धानंतरच शांततेचं महत्व पटतं, ही खरी गोष्ट आहे.
उद्याचा काळ स्थिर-प्रवाही शांततेचा असेल. ‘काळ’ ही संकल्पना कधीच गोठलेली असत नाही, त्यामुळे आपण आशा ठेवायला हरकत नाही, अशा विचाराप्रत येऊन मी स्वत:तला गोंधळ कमी करायचा प्रयत्न करतो.
शत्रुत्व असू नये कुणाचं कुणाशीच. अगदी स्वत:चं स्वत:शीही. पण या कल्लोळाच्या प्रहरात चांगल्याला चांगलं म्हणण्याची आणि वाईटाला विरोध करण्याची हिंमत आपण दाखवायला हवी, हेही तितकंच खरं आहे.
उजेडाची बेटं आपण शोधायला हवीत.
उदय प्रकाश यांची एक ओळ आहे – कुछ नही सोचने और कुछ नही बोलने पर आदमी मर जाता है.
असं मरायचं नसेल तर बोलायला हवं असतं, उजेडाचे ठाव शोधावे लागतात आणि मानवी मूल्यांची तिकडे वस्ती वसवावी लागते.
माझी एक अगदी छोटीशी कविता आहे-
आडदांड पाटलाने
निराधार बाई ठासावी,
बेगुमानपणे, भरदिवसा,
तसलं पाशवी वर्तमान
भूत-भविष्याच्या उज्वल छाताडावर
अपरंपार पाय रोवून.
स्वच्छ निळ्या आभाळाचे दिवस
कसे असतात कुणास ठाऊक?
कुठं सापडेल नि:शंक पाण्याची नदी,
अन्, कसदार कुशीची जमीन कशी असते,
हेही, कुणास ठाऊक !
नाळेपासून तुटलेली अन्
भुईचा आधार सुटलेलीच
माणसे जागोजाग,
पाताळापासून अंतराळापर्यंत.
कुठल्या शिवारात वस्तीला आहेत
दिवेलागण झालेली गावं?
- या कवितेतला ‘पाटील’ हा शब्द व्यक्तिवाचक, नामवाचक किंवा समूहवाचक नाही, तो ‘सत्तावाचक’ आहे. तिथे आपण राजा, बादशहा किंवा सुलतान असं काहीही म्हणू शकतो. अगदी आदिम काळापासूनच, कुठलीही सत्ता अंतिमत: अशक्तांच्या जगात काळोख पेरून स्वत:ची सिंहासने उजळून घेण्यासाठीच वापरली जात असते. त्या काळोखाच्या जगातून ही अशी दिवेलागण झालेली गावं शोधणं आणि गावागावातला वर्तमान लख्ख प्रकाशाने भारून टाकण्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी लागणारं बळ माझ्यासकट आपल्या सर्वांना लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
इथे या सन्मानाच्या आसनावरून मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाई, आणि सर्व संबंधितांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
धन्यवाद.
बालाजी सुतार
अंबाजोगाई

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा