ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीची रविवारी नंदुरबार व शहाद्यात बैठक
ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीची
रविवारी नंदुरबार व शहाद्यात बैठक
नंदुरबार (प्रतिनिधी) ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीने रविवार दि. १२ रोजी सकाळी १० वाजता नंदुरबार येथे व दुपारी एक वाजता शहाद्यात संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या ८/९ वर्षांपासून ईपीएस - ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस लढा देत आहे. परंतु अद्याप फक्त आश्वासनां व्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही. नुकतेच दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव इंजि. विरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय सल्लागार डॉ. पी. एन. पाटील, दिल्लीचे समन्वयक रमेश बहुगुणा यांनी श्रममंत्री मनसुख मांडविया तसेच भविष्य निधीचे उच्चस्तरीय अधिका-यांच्या भेटी घेतल्या. मंत्री महोदयांच्या आवाहनानुसार रामलीला मैदानावरील दि १० व ११ डिसेंबर २०२४ चे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. असे असताना काही विकृत सदस्य यु ट्युब वरील खोट्या बातम्या टाकून सदस्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. यासाठी वास्तव काय आहे, संघटनेची पुढची वाटचाल व रणनिती काय असेल, याअनुषंगाने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनात आतापर्यंत सर्वांनी तन मन धनाने सहभाग दिला आहे. भविष्यात देखील आपले सहकार्य अपेक्षित आहे. आपले महत्वपूर्ण पाठबळ व योगदान मिळावे, व आपल्या मनावर साचलेली मरगळ दूर व्हावी यासाठी नंदुरबार व शहाद्यात सभेचे आयोजन केले आहे. पहिली जिल्हास्तरीय सभा नंदुरबार येथे गांधीनगर शेजारील ज्येष्ठ नागरिक पेन्शनर्स संघटनेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता होईल. दुसरी सभा दुपारी १ वाजता गोकर्णेश्वर महादेव मंदिर प्रांगण, खेतिया बायपास रोड, रामदेव बाबा नगर, शहादा येथे होणार आहे. सभेला धुळे जिल्हाध्यक्ष देविसिंगअण्णा जाधव, उपाध्यक्ष ए. वाय. सोनवणे, सरचिटणीस जे. आर. सुर्यवंशी, समन्वयक संजय पाटील, कोषाध्यक्ष भोजुसिंग गिरासे आदी मार्गदर्शन करणार आहेत. सभेला जिल्ह्यातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोरखतात्या माळी, उपाध्यक्ष रमण झुलाल पाटील, सरचिटणीस परमेश्वर जाधव चव्हाण, नंदुरबार तालुकाध्यक्ष सुदाम फुला वरसाळे, शहादा तालुकाध्यक्ष प्रताप मुरलीधर चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा