स्वागताध्यक्ष दगडूदादा लोमटे यांचे स्वागताध्यक्षीय भाषण

दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन, अंबाजोगाई 





स्वागताध्यक्ष दगडूदादा लोमटे यांचे स्वागताध्यक्षीय भाषण


साधना सेवाभावी संस्था आयोजित दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनना निमित्त सुरेश भट गझल नगरीत, भाऊसाहेब पाटणकर स्मृती प्रवेशद्वार व सतीश दराडे स्मृती मंचावरून आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.    

या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे, उद्घाटक डॉ. संदीप गुप्ते, अमळनेर येथे पार पडलेल्या पहिल्या अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार शिवाजी जवरे, माजी स्वागताध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष  डॉ. सुरेश खुरसाले, रसिकाग्रणी नाना लोढम, दत्ता बाळसराफ, प्रशांत वैद्य, आमदार नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी माजी आमदार पृथ्वीराज साठे, उपस्थित विविध गझल मुशायऱ्यांचे अध्यक्ष, सूत्रसंचालक, सहभागी गझलकार,   मंचासमोर बसलेले सर्व रसिक आणि बंधुभगिनीनो, उपस्थित सर्व मान्यवर, स्वागत समितीचे ईतर सर्व पदाधिकारी व सदस्य,  उपस्थित पत्रकार बांधव यांचे  मी दगडू  लोमटे, स्वागताध्यक्ष या नात्याने दुसरे अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलनात मनःपूर्वक स्वागत करतो. मराठी, इंग्रजी व उर्दू भाषेवर प्रभुत्व असलेले डॉ. दिलीप पांढरपट्टे  यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. याचा वेगळा आनंद माझ्यासाठी  आहे. गेली चार दशके ते गझल लिहीत आहेत आणि सुरेश भट यांचा सहवास, मार्गदर्शन व आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. त्याच बरोबर ज्यांना आपण गझल साधना पुरस्कार देणार आहोत ते गझल गंधर्व सुधाकर  कदम त्यांनाही सुरेश भट यांचा सहवास लाभलेला आहे. संगीतकार व गायक म्हणून त्यांना शाबासकी मिळालेली आहे. हा या संमेलानाचा दुहेरी आनंद आहे.      

हे गझल संमेलन अंबाजोगाईत होत आहे. अंबाजोगाई हे स्वतःचे वेगळेपण जपणारं शहर आहे. साहित्य, संगीत, नाटक, समाजकारण, सकस राजकारण व संस्कृती जपणारे हे शहर आहे. हे शहर आद्यकवी मुकुंदराज, सर्वज्ञ दासोपंत यांचे आहे. मराठीची पहिली  ओवी आणि ग्रंथ ज्यांनी लिहीला त्या मुकुंदराजांची ही नगरी. ‘वैनगंगेचिये तिरी मनोहर अंबानगरी’  असे लिहिणारे मुकुंदराज या शहराचे. प्रकांड पंडीत दासोपंत याचं हे शहर. साहित्य, संगीत, नाटक, शेती, स्थापत्य कला अशा विविध विषयावर त्यांचे लिखाण सर्वश्रुत आहे. सर्वज्ञ यासाठीच म्हटलं आहे की, त्यांनी कुठला विषय हाताळला नाही? त्यांची ही नगरी. मराठवाड्याच्या या अंबाजोगाई नगरीला प्राचीन इतिहास आहे. सांस्कृतिकता, साहित्य, कलात्मकता इथे जपली गेली आहे. अंबाजोगाईला अनेक योगिजन आणि कर्तृत्व संपन्न महापुरुषांचा वारसा लाभला आहे. योगि व विद्वानाचे हे शहर आहे. याचे अनेक पुरावे व पाऊलखुणा आपल्याला सापडतील. हे शहर हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ व कर्मयोगी बाबासाहेब परांजपे यांचे शहर आहे. कर्मठ धार्मिकता, पुरोगामित्व आणि आधुनिकता असा संगम जपणारे हे शहर आहे. कॉ. गंगाधारअप्पा बुरांडे यांच्या सारख्या निस्पृह: व गरिबांचे वाली असलेल्या कॉम्रेडचे शहर आहे. राजकारणात आपले वेगळेपण जपणारे व साहित्य संगीत, सांस्कृतिक व समाजकारणात आदर्श निर्माण करणाऱ्या भगवानराव लोमटे यांचे हे शहर आहे. आपल्या पखवाजाने जगाला वेगळी अनुभूती देण्याऱ्या पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांचे हे शहर आहे. साहित्य, नाटक या क्षेत्रात काम करत महिलांचा हक्कासाठी लढणाऱ्या शैलाभाभी लोहिया व सामाजिक कामात अग्रणी राहून शेतकर्‍यांचे उत्थान करू पाहणाऱ्या डॉ द्वारकादास लोहिया याचं हे शहर आहे. साहित्यात आपले वेगळेपण जपणारे परंतु अल्प आयुष्य लाभलेले ग्रामीण कथाकार व कादंबरीकार त्रंबक आसरडोहकर यांचे हे शहर. अवलिया फकीर होऊन लोकांच्यासाठी जगलेले व कला, संगीत, साहित्य, नाटक या प्रांतासाठी आयुष्य वेचलेले राम मुकद्दम यांचे हे शहर. या सर्वांच्या आठवणी इथल्या कणाकणात आपल्याला जाणवतात.

अंबाजोगाईची शिल्पे, मंदिरे प्राचीन आहेत. योगेश्वरी देवीचे अस्तित्व अख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथले जैन मंदिर, मस्जिद, चर्च अंबाजोगाईचा प्राचीन इतिहास व भाईचारा जपणारा आहे हे वेगळे सांगायला नको. सामाजिक एकोपा व दिलदारपणा हे अंबाजोगाईचा खरा स्वभाव आहे. शिक्षणाचे हे माहेरघर आहे. शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय व तंत्र शिक्षण इथे आहे. जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ राम भालचंद्र व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे अंबाजोगाईचे. न्याय क्षेत्रात सर्वोच्च पदावर गेलेले नाव. न्या. व्ही. एस. देशपांडे, न्या. सुधाकर कुर्डूकर व न्या. अंबादास जोशी हे अंबाजोगाईचे. साहित्यात ‘बीनपटाची चौकट’ लिहिणाऱ्या इंदुमती जोंधळे-पवार याच मातीतल्या. प्रा. हरिहर मातेकर, प्रा. रा.द. अरगडे, प्रा. संभूस, रा.स देशपांडे व राम मुकद्दम यांनी एकेकाळी आपले साहित्याने प्रंचक्रोषी गाजवलेले हे शहर आहे. दलितसाहित्य, स्रीवादीसाहित्य, वैचारिक साहित्य, लोकसाहित्य लिहिणारे व चळवळ चालविणाऱ्या सृजनांचे हे शहर आहे.  हे शहर नाटकाच वेड असलेले शहर आहे. जुन्या व आताही या काळात हौशी नाटके बसविली जातात. साधू गुरुजी, ललिता मुकद्दम, शैला लोहिया, राम मुकद्दम, डॉ. प्रकाश व शामा प्रयाग, प्रा. दिलीप घारे, संजय कुलकर्णी, रमेश गंगणे, बाबा जोशी, प्रा. केशव देशपांडे   प्रा. सुधीर वैद्य व इतर कलावंत या मातीने दिले आहेत. नाटके लिहिणारी पिढी इथे घडली व घडते आहे. कलासंगम संस्थेने नाटकातुन तर राष्ट्र सेवा दलाच्या पथकाने वगनाट्यातून या गावाला संस्कारित केले आहे. दलित नाट्य संमेलन घेतलेलं हे शहर आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन घेतलेलं हे शहर आहे. अनेक संगीत सभा घेतलेलं हे शहर आहे. पूर्वी करमणुकीची साधने नव्हती तेंव्हा मेळे बसविले जायचे. त्याच्यातून दिलीप घारे, संजय सुगावकर, बाबा देशपांडे व इतर कलावंत या मातीने घडविलेले आहेत. अलीकडे भगवानराव लोमटे यांनी सुरु केलेला व ४० वर्ष सातत्याने आयोजित केला जाणारा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह या गावाचे खास आकर्षण झाले आहे. गावात नरहर कुरुंदकर स्मृती प्रतिष्ठान यांच्यासह अनेक संस्थाही कार्यरत आहे. या सगळ्या उपक्रमामुळे गावाला साहित्य, संगीत, वैचारिक व शैक्षणिक संस्कार होत गेले. अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे गोटे गुरुजी, एकनाथराव कुलकर्णी गुरुजी, बेथुजी गुरुजी, निकम गुरुजी,  बोर्डे गुरुजी या मातीतले. देशाच्या राजकारणात बापूसाहेब काळदाते, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे या मातीनेच दिले आहेत. मराठी पत्रकारितेत अंबाजोगाई मागे नाही या शहराने महावीर जोंधळे, अमर हबीब, संजीव उन्हाळे व सचिन काटे यांच्या सारखे प्रतिथयश पत्रकार महाराष्ट्राला दिले आहेत. अश्या या बहुआयामी अंबाजोगाईत हे संमेलन होत आहे, याचा मला प्रचंड आनंद आहे.      

हे संमेलन घेण्याची प्रेरणा फार वेगळी आहे. १९८३ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे पार पडले होते,  त्यात सुरेश भट यांच्या गझल वाचनाचा कार्यक्रम  ठेवला होता.  सतत तीन तास सुरेश भट गझल म्हणत होते आणि त्याचे निरूपण प्रतिथयश साहित्यिक करत होते. मी त्यावेळी १७-१८ वर्षाचा होतो. पूर्वी रेडीओवर मंगेशकर भगिनिनी त्यांची गीते गायली होती ती मी ऐकलेली होती. पण त्या कवीला प्रत्यक्ष पाहण्याची आणि अगदी स्टेज समोर बसून ऐकण्याचे भाग्य मला व अंबाजोगाईकर यांना लाभले होते.  तेंव्हा पासून मला गझलेचे वेड लागले होते. गझलेतले फारसे काही कळत नव्हते परंतु त्याच्या आशयावर  मी भारावून जायचो. आणि तेव्हा पासून मी कवितेच्या व गझलेच्या प्रेमात अडकलो तो कायमचा, त्यानंतर सुरेश वैराळकर यांच्या सुरेशभट गझल मंच आयोजित प्रत्येक मुशायरे मी पुण्यात, नागपुर, मराठवाड्यात उपस्थित राहून  ऐकले.  मी वारी सारखा पुण्यात दर महिन्याला गझलरंग मुशायऱ्याला जात होतो. त्यामुळे गझलेचे तंत्र थोडेफार समजले. पण गझल वरवर सोपी वाटणारी किती अवघड आहे हे आता कळायला लागले आहे.  वेगवेगळ्या गझल संमेलनातील माझी उपस्थिती पाहून काही लोक मला ज्येष्ठ गजलकार समजायला लागले इतका मी गझलेशी समरस झालो आहे. 

मराठी साहित्य संमेलनात डोंबिवली पासून गझल कट्टा सुरू करण्याची प्रथा सुरू झाली होती यात प्रशांत वैद्यांचा सिंहाचा वाटा होता हे इथे नमूद करायला मला आनंद होतो.  त्यानंतर डोंबिवली ते वर्ध्यापर्यंत हा गझल कट्टा साहित्य संमेलनात ठेवला गेला परंतु अमळनेर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून गझल कट्टा स्वतंत्र न घेण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला. त्यामुळे गझलकरांना जसे दुःख झाले तसे या निर्णयाचे मलाही व्यक्तिगत दुःख झाले म्हणून शरद धनगर, सदाशिव सूर्यवंशी, दास पाटील, प्रशांत वैद्य, नाना  लोढम, मी आणि इतर सर्व गझलकारांनी गझल संमेलन सुरू करण्याची कल्पना मांडली आणि अमळनेर येथे खानदेश साहित्य संघाच्या वतीने पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन शिवाजी जवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.  ते अत्यंत देखणे आणि भव्य स्वरूपाचे संमेलन झाले. अल्पावधीमध्ये अनेक गझलकरांनी त्यास आर्थिक सहकार्य केले. स्थानिक संयोजकांनी त्यात हातभार लावला आणि हे संमेलन खऱ्या अर्थाने  रसिकांच्या जीवावरती पार पडले हे मला इथे नमूद करायला आनंद वाटतो.  याच संमेलनात दुसरे संमेलन कुठे घ्यावी असा  विचार सुरू झाला आणि आपण ही प्रथा सुरू झाली ती बंद पडू नये याचा विचार करू लागलो. नितीन देशमुख, शरद  धनगर व सदाशिव सूर्यवंशी यांच्याशी अंबाजोगाई येथे  संमेलन घेण्याची इच्छा सांगितली. मी उत्स्फूर्तपणे समारोपाच्या अगोदर अमळनेर एल्गार गझल संमेलनात  दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन हे अंबाजोगाईला होईल असे मी जाहीर केले आणि आज हे संमेलन इथे मूर्त स्वरूपामध्ये आपल्या उपस्थितीत संपन्न होते याचा मी आनंद व्यक्त करतो.      

अंबाजोगाई हे सर्व प्रकारच्या चळवळीचे केंद्र राहिले आहे. इथले समाजमन सकस व चांगुलपणाला कवेत घेणारे शहर आहे. पुरोगामी चळवळीचा वारसा इथल्या नव्या जुन्या पिढीत आहे. कसलीही कटुता न ठेवता मनमोकळेपणाने इथे चर्चा होतात. राजकीय, वैचारिक, सामाजिक विविधता आहेच पण निकोप पणे इथे एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती इथल्या मातीत आहे. म्हणून इथली साहित्य, संस्कृती, संगीत, नाट्य परंपरा मोठी आहे. त्यात कुठलाही भेद टिकेला जात नाही. महाराष्ट्रात यादृष्ठीने नावाजलेले शहर आहे. इथेच संमेलन मूर्तरूप घेवू शकते. आणि हे संमेलन आपल्या साक्षीने संपन्न होत आहे. 

या संमेलनामध्ये आज आपण सुरेश भट गझल नगरी असे म्हटले आहे. सुरेश भटांनी ज्या पद्धतीने गझलेला पुढे नेण्याचे कार्य अहोरात्र  केले.  मराठी गझल मनामनात रुजवण्याचे मोठे काम केले. नवीन लिहिणाऱ्या गझलकरांना मार्गदर्शन करणे, स्वतःहून त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्या चुका दाखवणे, योग्य असेल तर शाबासकी देणे हे काम त्यांनी केले.  मराठी गझल  लिहिणाऱ्यांच्या मनामनात अधिक खोलवर त्यांनी रुजवली आणि आज त्या एका छोट्या वृक्षाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले हे आपण पाहतो आहोत. मराठी गझल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक जण लिहीत आहेत. ती आता शहरातून शेतकरी , कष्टकरी यांच्या पर्यंत पोहचली आहे.  ग्रामीण भागात गझल सकसपणे लिहिली जात आहे. विशेषतः अलीकडची तरुण पिढी इतक्या मोठ्या ताकदीने लिहिते आहे की मराठी गझलेच भवितव्य केवळ प्रश्नचिन्हच राहिले नाही तर भक्कमपणे आता समोर येत आहे. याचे खरे श्रेय सुरेश भट व त्यानंतर  लिहिणाऱ्या गझलकारांना जाते. ही आनंदाची गोष्ट आहे म्हणून या नगरीला 'सुरेश भट गझल नगरी' असे म्हटले आहे. भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठी शायरी वेगवेगळ्या पद्धतीने इथल्या मातीत रुजवली आणि उर्दू शायरी बरोबर मराठी शायरी त्यांनी खंबीरपणे समोर आणली.   त्यांची शायरी सादर करण्याची पद्धत आणि ती मनात खोलवर रसिकांमध्ये  रुतून जाईल अशा पद्धतीचा विचार आणि त्याची मांडणी हे भाऊसाहेब पाटणकर यांचे एक वैशिष्ट्य होते. भाऊसाहेब पाटणकर आणि मराठी शायरी हे तुफान होते.  त्यांनी शायरी वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पोहोचवली. रेडिओ असेल किंवा इतर माध्यमातून त्यांनी ती शायरी रसिकांपर्यंत पोहचवली. त्यांची दोन पुस्तकं पण प्रकाशित आहेत.  म्हणून भाऊसाहेब पाटणकर हे सुरेश भटांच्या सोबतच मराठी गझल आणि शायरी मधलं महत्त्वाचं नाव आहे म्हणून त्यांचे नाव आपण प्रवेशद्वाराला  देऊन त्यांची स्मृती जागवली आहे. 

सतीश दराडे हे नाव मराठी गझलेतलं अलीकडच्या काळातलं अत्यंत ताकदीचे नाव आहे. ग्रामीण भागात जन्म घेऊन बीड जिल्ह्यासारख्या डोंगर पट्ट्यामध्ये छोट्याशा टोकवाडी नावाच्या गावात जन्म घेऊन तो शिकला.  पुढे अंबाजोगाईत काही वर्ष राहिला. इथे त्यांनी स्वामी रामानंद महाविद्यालयात  शिक्षण घेतलं आणि इथल्या मातीत राहूनच त्याला कवितेचे खरे संस्कार झाले. नंतर तो गझलेकडे वळला आणि महाराष्ट्रातल्या मनामनात जावून बसला.   त्यांने ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवन, प्रेम आणि व्यथा आशाची सांगड घालून शब्द जंजाळ उभा केले. सतीश दराडे यांच्या गझलेणे अनेकांना वेड लावले.  नवीन तरुण पिढी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जाऊ लागली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर अनेकांना गझल शिकवली. त्यांच्या कडून लिहून घेतली. ही सुद्धा मोठी गोष्ट सतीश दराडे यांनी केली आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन मोठा झाला आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रामध्ये ठळक नाव केले आहे.  आज सतीश दराडे आपल्यात नाही याची खंत व  दुःख आपणा सर्वांनाच आहे. म्हणून या मंचाला 'सतीश दराडे स्मृती मंच' असे नाव दिले आहे.  सतीश दराडे यांचे जाणे हे जसं अनेकांच्या जिव्हारी लागलेलं आहे,  त्याच्या कुटुंबाला ते दुःख  सोसावे लागत आहे. त्याचे मित्र, गझल प्रेमीं यांच्यातून या दुःखाची सल आजही निघून जात नाही. ते दुःख आजही आपल्या सर्वांना आहे. आणि याची  प्रचिती पुन्हा पुन्हा येत आहे.  परंतु काळ पुढे सरकत जात असतो सतीश दराडे हा देहाणे आपल्यात नाही.  त्याच्या गझला आपल्या सोबत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात कमावलेला जो काही मित्रपरिवार आहे ती संख्या ही खूप मोठी आहे. त्याचा मुलगा आणि मुलगी दोघेही चांगली शिकलेली आहेत. आपण सर्वांनी त्या लोकांना माणुसकीच्या दृष्टीने आधार दिला आहे. 

अंबाजोगाईचे भगवानराव लोमटे यांचे नाव ग्रंथदालनाला दिले आहे. राजकारणात राहूनही अंबाजोगाईच्या एकूण साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मोठं कार्य  केलेले नाव आहे. ते १९८० च्या दशकात जिल्हा परिषद बीडचे शिक्षण खात्याचे सभापती होते, नगराध्यक्ष, पुन्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण, वेणूताई चव्हाण यांच्या नावे शिक्षण संस्था काढल्या खेड्यापाड्यात माध्यमिक शिक्षण पोहचवले. महिला व मुलींच्या शिक्षणाची मोठी व्यवस्था त्यांनी केली. त्याच बरोबर यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह सुरु करून अंबाजोगाईत साहित्य, संगीत, शेती, ललितकला यांची मोठी चळवळ उभा केली, ती चळवळ अंबाजोगाईचे वैभव आहे. अशा अनेक सांस्कृतिक, साहित्यिक, सांगीतिक उपक्रम इथे अनेक संस्था सतत करत असतात.  त्यांच्या या कार्याची दखल घेवून ग्रंथ दालनाला 'भगवानराव  लोमटे ग्रंथ दालन' हे नाव दिले आहे. 

या दोन दिवसात आपला सहवास व आपले विचार ऐकण्याची संधी आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.  हे संमेलन अंबाजोगाईला भरवताना अंबाजोगाईचा सुंदर परिसर आपल्याला आकर्षित करतो. इथली शिल्पे, हेमाडपंथी मंदिरे, वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना हत्तीखाना, बौध व जैन लेण्या, आद्यकवी मुकुंदराज यांची समाधीस्थळ, दासोपंत यांचे समाधीस्थळ व त्यांचे थोरले व धाकटे देवघर तिथे असलेली पासोडी, ऐतिहासिक हेमांडपंथी मंदिरे, दर्गे, जैन मंदिरे पाहण्या जोगी आहेत. इथल्या जंगलातील प्राणी, दुर्मिळ वनऔषधी व अनंत पक्षी आपणास पहावयास मिळतात. महत्वाचे म्हणजे इथले शांतताप्रिय समाजमन. इथली शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय व तंत्रशिक्षण महाविद्यालये, उर्दू भाषी शाळा, इथली बोलीभाषा, सुसंस्कृत समाज सगळं काही वेगळं. 



आज व उद्या दोन दिवस आपण गझल सादर करणार आहात. त्या गझलातून समाजाने दुःख, व्यथा, वेदना मांडण्यात येतील अशी खात्री आहे. मराठी गझल लिहिली जावू लागली. फारशीतून उर्दूत नंतर ती  मराठीत आली. आता मराठी गझल स्थिरावत आली आहे.  मराठवाडा हा निजामाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे इथली मातृभाषा ही स्वातंत्र्यपूर्वकाळात उर्दू होती. त्यामुळे इथे उर्दू गझल, उर्दू संस्कृतीचा तुम्हाला पावलोपावली अनुभव येऊ शकतो. इथल्या उर्दू आणि मराठी भाषिक या दोघांनी मिळून भाषा समृद्ध करण्याची परंपरा आजही राखली आहे. उर्दू आणि मराठवाड्याचे समीकरण पण आहे. म्हणून मराठी भाषिक असून ज्यांनी उर्दू लिपी शिकून उर्दूमध्ये गझल लिहिली असे काही गझलकार आणि ज्यांची मातृभाषा उर्दू आहे असे गझलकार यांचा एक मुशायरा ठेवला आहे. त्याचे आपण स्वागत कराल ही अपेक्षा आहे. समाजाला या संमेलनातून काहीतरी घेता येईल. त्यांच्या व्यथा, वेदना, दुःख, आनंद याचा मिलाप असलेली गझल इथे ऐकायला मिळेल आणि ही गझल इथल्या मातीत,  इथल्या संस्कृतीच्या या चळवळीच्या ठिकाणी नवीन संदेश देईल.  जो संदेश पुढच्या पिढीसाठी कायमचा मनात कोरला जाईल अशी आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण या संमेलनामध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिलात खरं म्हणजे मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. निवड समिती, संयोजन समिती, स्वागत समिती, मार्गदर्शक आहेत, त्यांचे शतशः आभार. महाराष्ट्रातली अनेकांनी  आपापल्या परीने आर्थिक हातभार लावला आहे. या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत किंवा त्यांच्या ऋणात राहायचं आहे.  हे नातं गझलेच्या निमित्ताने अंबाजोगाईशी जोडले गेले ते नाते कायम आपण जपू आणि ते जपावं लागणार आहे.  अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. मंचावर उपस्थित राहिलेले सर्वांचे मनापासून आभार मानतो. डॉ.  दिलीप पांढरपट्टे यांनी  संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारलं त्याबद्दल आभार मानतो. 

आमच्या क्षमतेनुसार निवास, भोजन, वाहतूक व्यवस्था केली आहे. स्वागत करण्यात जो कमीपणा आला असेल तो मोठ्याने मनाने स्विकारावा व हे संमेलन यशस्वी  कराल, ही माफक अपेक्षा.

जयहिंद जय..... जय महाराष्ट्र .... जय जगत....!



दगडू लोमटे

स्वागताध्यक्ष,

दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन, अंबाजोगाई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni